मेळघाटातील गरजूंच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
मेळघाटातील वंचित, गरजू आदिवासी नागरिकांना मदत मिळण्याच्या दृष्टीने सामर्थ्य फाउंडेशनने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. समाजातून चांगले, वापरण्यास योग्य कपडे गोळा करून ते मेळघाटमधील दुर्गम गाव धारुर धारगड येथे वाटप करण्यात आले. परिधान करण्यासाठी उत्कृष्ट वस्त्र मिळाल्याने गरजू आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सामाजिकसह विविध लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. शहरामध्ये अनेकांकडे चांगले दर्जेदार वस्त्र वापराअभावी पडून असतात.
अनेकवेळा कपडे लहान होत असल्याने त्याचा वापर होत नाही. समाजासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांकडून सुस्थितीतील वस्त्र गोळा करून ते मेळघाटातील आदिवासी गावामध्ये वाटण्याचा उपक्रम सामर्थ्य फाउंडेशनने सुरू केला आहे. यासाठी अकोला शहरातून मोठ्या प्रमाणात वस्त्र गोळा करण्यात आले.
नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत हजारो शर्ट, पॅन्ट, साडी, ड्रेस, लहान मुलांचे कपडे संस्थेकडे जमा केले. ते सर्व कपडे स्वच्छ धुवून प्रेस करण्यात आले. त्यानंतर वाहनांमधून हे कपडे मेळघाटातील दुर्गम गाव धारुर धारगड येथे नेण्यात आले. गावातील गरजू ग्रामस्थांना या कपड्यांचे वाटप केले.
यावेळी सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडखले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगावकर, कार्यकारिणी सदस्य दिनेश चंदन, राजकुमार उखळकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, नितीन डोंगरे, प्रा.अशोक सोनोने, ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, कायदेविषयक सल्लगार ॲड.संतोष भाेरे, निमंत्रित तज्ज्ञ डॉ.श्रीकांत उखळकर, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, मिलिंद शनवारे, मिलिंद देव, नकुल राठी, प्रकाश जाधव, सुधीर धुळधुळे, मुकुंद देशमुख, मुकेश मिना, विजय मोहरीर, प्रा. दत्तराज विद्यासागर आदी उपस्थित होते.
पुनर्वसन झालेल्या धारुर धारगड गावात वस्त्रदान करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व समाधान व्यक्त केले. कपडे घेण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.
चिमुकल्यांना खाऊंची मेजवानी
सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वस्त्रदान उपक्रमांतर्गत धारुर धारगड गावात चिमुकल्यांना विविध खाऊंची मेजवानी देखील देण्यात आली. खाऊ मिळाल्याने लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.