घरगुती गणेशोत्सवात पर्यावरण व जनजागृतीपर आकर्षक देखावा-सजावट स्पर्धा ‘सामर्थ्य’च्यावतीने दरवर्षी घेण्यात येते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सोबत घेऊन संस्था वृक्षारोपण व संवर्धनाची विशेष मोहीम देखील राबवते.
सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘सामर्थ्य’ने विविध उपक्रम हाती घेतले. ‘सामर्थ्य’ने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत विविध पुरस्कार देऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट व जनजागृतीपर देखावा करणाऱ्या गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पर्यावरण अभ्यासक्र व ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव, तर पुरस्कार प्रायोजक चिन्मय देव, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, स्पर्धा समन्वयक प्रवीण पळसपगार, सुर्यकांत बुडकले, प्रशांत चाळीसगांवकर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कायदेविषयक सल्लागार ॲड. संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम देशपांडे, किरण चौक, दिनेश चंदन, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, सुधीर धुळधुळे, मिलिंद शनवारे, मुकुंद देशमुख आदींनी केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परीक्षक दीपक जोशी व ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी स्पर्धकांच्या गणेशोत्सवाचे सुक्ष्मपणे निरीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
प्रथम पुरस्काराचे मानकरी संजय देशमुख ठरले, द्वितीय पुरस्कार मेघा राजुरकर, तृतीय पुरस्कार राजेंद्र सोनवणे, तर प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी ऋषिकेश मिलिंद गायकवाड व शीला जोशी यांनी निवड परीक्षकांनी केली. मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.