दिमाखदार उद्घाटन सोहळा व व्याख्यान

जिद्द व चिकाटीने कार्य केल्यास क्रांती निश्चित…

– डॉ. शंकरबाबा पापळकर

अकोला : सामाजिक क्षेत्रात झोकून देत कार्य करण्याची गरज आहे. जिद्द व चिकाटीने काम केल्यास सामाजिक परिवर्तन होऊन क्रांती निश्चित होऊ शकते, असे मत ज्येष्ठ समाजसेवी, अनाथांचे नाथ डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी येथे व्यक्त केले.
श्री. रालतो विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित सामर्थ्य फाउंडेशन व जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, तर विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी निमा अरोरा उपस्थित होत्या. दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, श्री. रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार प्रकार पोहरे, डॉ.राजीव बियाणी, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, कनिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘सामाजिक क्षेत्रात बदललेले स्वरूप व स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावर डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी सविस्तर मांडणी केली. पुढे बोलतांना ते म्हणाले, सामाजिक कार्यात झपाट्याने बदल होत आहेत. नेहमीचेच कार्य करण्याऐवजी सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यात देखील बदल करण्याची गरज आहे.

मोठे प्रकल्प राबवून स्वयंसेवी संस्थांनी परिवर्तनाची चळवळ हाती घेतली पाहिजे. त्यातून तरुणांसाठी रोजगार निर्मिती देखील होईल. ती खरी समाजसेवा ठरेल. जगातील १०० सर्वश्रेष्ट विद्यापीठांमध्ये आपल्या देशातील एकही विद्यापीठ नाही. ही खरी शोकांतिका आहे. देशातील शिक्षण पद्धती देखील प्रगत होण्याची गरज डॉ. पापळकर यांनी व्यक्त केली.

आदर्श ज्येष्ठ समाजसेवींकडून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा तरुणांना मिळत असते. त्या प्रेरणीतून तरुणांनी समाजसेवेकडे वळण्याची गरज जिल्हाधिकारी निमा आरोरा यांनी व्यक्त केली. अकोल्यात कार्य करण्यासाठी मोठी संधी असून सामाजिक कार्यातून आत्मसमाधान प्राप्त होत असल्याचे ॲड. मोतीसिंह मोहता म्हणाले. निराधारांची नि:स्वार्थ सेवा करून स्वयंसेवी संस्थांनी आत्मबल वाढविण्याचे कार्य करावे, सामर्थ्य फाउंडेशनने सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन प्रा.संजय खडसे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम घेणे देखील गरजेचे असल्याचे सांगितले. व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून स्वयंसेवी संस्थांनी तरुणांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. भाले म्हणाले. डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात फळबाग फुलवण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन करण्यात येईल. त्यातून आश्रमातील दिव्यांगाना रोजगार देखील उपलब्ध होईल, असे डॉ. विलास भाले म्हणाले.

प्रास्ताविकात प्रबोध देशपांडे यांनी संघटना स्थापनेची पार्श्वभूमी व पुढील कार्याची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय रवींद्र बुलनकर आणि डॉ. दीपक दामोदरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.संतोष भोरे यांनी, तर आभार पत्रकार राजकुमार उखळकर यांनी मानले. वैशाली भोरे, श्रृती बुडकले, वैष्णवी वाघोडे, ऐश्वर्या बुलनकर, प्रिया चाळीसगांवकर, श्वेता चाळीसगांवकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

चौकट

अंगणवाडी शब्दाचा उगम अकोल्यातून

अकोल्यात १९३४ मध्ये ताराबेन मश्रुवाला यांनी १० मुलांना घेऊन अंगणात शिकवणी सुरू केली. त्याला अंगणवाडी हे नाव दिले. त्याच नावाचा राजपत्रात उल्लेख करून संपूर्ण देशात ‘अंगणवाडी’ उघडण्यात आल्या आहेत, असे डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी सांगून अंगणवाडी शब्दाचे उगमस्थान अकोला असल्याचे म्हणाले.

देणगीची ‘देवाण-घेवाण’

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमासाठी ११ हजाराची देखणी देण्यात आली. डॉ. शंकरबाबांनी मोठ्या मनाने त्या देणगीत स्वत: जवळचे एक हजार रुपये टाकून १२ हजारांची देणगी सामर्थ्य फाउंडेशनला प्रदान केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *