सामर्थ्य फाउंडेशनने दि बेरार जनरल एज्युकेशन साेसायटीच्या सहकार्यातून ११ ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमाला घेतली. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘परिस्थिती आज आणि उद्या’ या विषयावर आंतरराष्ट्रीय विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुंफले. द्वितीय पुष्प ‘शहरी नक्षलवाद – प्रचार आणि वास्तव’ या विषयावर नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नक्षलवादाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे यांनी, तर तृतीय पुष्प ‘ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हाने, वीज ग्राहकांवरील परिणाम व त्यांची भूमिका’ या विषयावर महावितरणचे संचालक (वाणिज्य) तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांनी गुंफले. या माध्यमातून अकोलेकरांना वैचारिक मेजवानी लाभली.
व्यवस्थेतील हुजरेगिरी मोडीत काढण्याची गरज – ॲड. प्रकाश आंबेडकर
प्रथम पुष्प – ‘परिस्थिती आज आणि उद्या’
अकोला : संविधानानुसार चालणाऱ्या भारतात लोकशाही असून येथे नागरिकांचे राज्य आहे. नागरिकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात लोकप्रतिनिधी कारभार चालविण्यासाठी निवडून दिले जातात. देशाचा खरा मालक मतदारच आहे. मात्र, ही संकल्पना समाजात रुजली नाही. गुलामगिरीच्या स्वभावातून हुजरेगिरीची मानसिकता आली. समाज व्यवस्थेतून हुजरेगिरी मोडीत काढण्याची गरज आहे, असे मत विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्री रा.ल.तो विज्ञान महाविद्यालयात आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेत ‘परिस्थिती आज आणि उद्या’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी बेरार संस्थेचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता होते, तर सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील परिस्थिती, अर्थव्यवस्था, आरक्षण, युवा पिढी, संस्कृती आदींवर विस्तृत भाष्य केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, आपण स्वत:ला देशाचा मालक समजत नाही. कारण ही संकल्पना आपल्यात रुजलीच नाही. इतर देशांमध्ये निवडून गेलेल्या प्रतिनिधीने काही गैरप्रकार केल्यास त्याला पोलिसांकडून शिक्षा मिळते. तो त्यांच्या समाजव्यवस्थेचा भाग आहे.आपल्या येथे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस लोकप्रतिनिधींची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असतात. सरकारला ‘मायबाप सरकार’ संबोधतो. तेव्हाही नागरिकांच्या गुलामगिरीची जाणीव होते. आपण आता स्वतंत्र झालो, हे मान्य करायलाच तयार नाही. त्यामुळे ही व्यवस्था समाजातून बाहेर काढावी लागेल.
संसदीय लोकशाहीत संविधानाच्या चौकटी बाहेर जाता येत नाही. अध्यक्षीय पद्धतीपेक्षा संसदीय लोकशाही पद्धत देशासाठी लाभाची आहे. या पद्धतीती समाजव्यवस्था स्थिर राहण्याची हमी आहे. त्यामुळे शांतता प्रस्थापित राहते, असे सांगून त्यांनी जातियव्यवस्थेवर परखड मत मांडले. जातीचा असेल, तर आपला व नसेल तर परका या विचारातून आता बाहेर येण्याची गरज आहे. कुटुंब व्यवस्था आणि युवा पिढीमध्ये होणाऱ्या बदलावर देखील त्यांनी भाष्य केले. परंपरागत पिढी आणि युवा पिढी यांच्या विचारात प्रचंड तफावत आहे. सध्याची पिढी चिकित्सक असून त्यांच्या पुढे ज्ञानाचा भंडार खुला आहे. युवा पिढीसोबत संवाद साधून त्यांचे मत विचारात घेतले पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसारच युवा पिढी वागेल असे गृहीत धरणे चुकीचे आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. नोटाबंदीवर न्यायालयात प्रकरण आहे. जर मंदीच्या उंबरठ्यावर निर्णय आला, तर जुन्या नोटा आणायच्या की नवीन नोटा ठेवायच्या? असा गोंधळ उडेल. समाज सुरक्षेसाठी त्यांनी बँक आणि शेअर बाजाराचे उदाहरण देऊन विषयाची मांडणी केली. बँक आपल्याला पैशांच्या बाबतीत सुरक्षित ठेवते. पण शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला स्वत:लाच अभ्यास करून गुंतवणूक करावी लागते. आजची समाजव्यवस्थाही अशीच आहे. येथे मला स्वतःला सुरक्षित करावे लागेल. त्यासाठी व्यवस्थेचे ज्ञान घेऊन येथे मत मांडणे शिकले पाहिजे. हे मत मांडले नाही तर व्यवस्था कोलमडायला सुरुवात होते, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर प्रमुख वक्त्यांचा परिचय ॲड.डॉ.दीपक दामोदरे यांनी करून दिला. सूत्रसंचालक ॲड. संतोष भोरे यांनी केले.
भविष्यात राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांमध्ये वाद
भविष्यात देशात राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाषा, जात यामुळे प्रादेशिक पक्षांना समर्थन वाढत जाईल. त्यातून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांमध्ये संघर्ष होईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. सामाजिक बहिष्कृत आणि आर्थिक दुर्बल यात प्रचंड तफावत आहे. ज्या समाजावर शिक्षणासह अनेक बंधने घातली गेली, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे. आर्थिक मागासलेल्यांना आरक्षण देण्याची घटनेत कुठलीही तरतूद नाही. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा असतांना ते ६० टक्के करण्यात आले. त्यामुळे आरक्षण मागणाऱ्या इतर समाजाचा मुद्दा अधिक प्रकर्षाने समोर येईल, असे ॲड.आंबेडकर म्हणाले.
समाज विभाजनाच्या प्रयत्नातून फुटीरतावादी चळवळीला बळ – देवेंद्र गावंडे
शहरी व जंगली नक्षलवादाचे मूळ एकच; सामर्थ्य व्याख्यानमाला, द्वितीय पुष्प – ‘शहरी नक्षलवाद-प्रचार आणि वास्तव’
अकोला : भेदभाव व धार्मिक द्वेषासारख्या समाज विभाजनाच्या प्रयत्नातून फुटीरतावादी चळवळींना बळ मिळत असते. हा देश व समाजासाठी मोठा धोका आहे. नक्षलवादाच्या शहरी व जंगली अशा शाखा असल्या तरी त्याचे मूळ एकच आहे. नक्षलवादासारख्या गंभीर प्रश्नाचे दुर्दैवाने राजकारण होत असून त्यात आदिवासींचा नाहक बळी जातो. राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्याची खरी गरज आहे, असे मत नक्षलवादाचे अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले.
दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्री रा.ल.तो विज्ञान महाविद्यालयात आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेत ‘शहरी नक्षलवाद-प्रचार आणि वास्तव’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतांना ते बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी बेरार संस्थेचे मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी, तर सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. देवेंद्र गावंडे यांनी विषयाची सविस्तर मांडणी करून नक्षलवादाच्या प्रश्नावर विस्तृत प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी नक्षलवादासंदर्भात अनेक उदाहरणे देऊन श्रोत्यांच्या मनातील शंकाचे निरासन केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, समस्येचे राजकारण करणे हा आपल्या देशातील मोठा अवगुण आहे. नक्षलवादाच्या प्रश्नांच्या बाबती सुद्धा दुर्दैवाने तीच परिस्थिती निर्माण झाली. २०१४ पासून आपल्याकडे दोन टोके तयार झाली. डाव्यांच्या म्हणण्यानुसार शहरी नक्षलवाद हा अपप्रचार आहे, तर या देशातील सरकारला विरोध करणारे सर्व शहरी नक्षलवादी आहेत, असे उजवे म्हणत असतात. मात्र, शहरी नक्षलवाद हा डाव्या व उजव्यांच्या दोन्ही टोकांच्या मधात आहे. नक्षलवादामध्ये शहरी किंवा जंगली भेदाभेद न करता त्याचे मूळ एकच असल्याचे लक्षात घेऊन या समस्येकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या मार्गाने कुणी जाणार नाही याची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागेल. ही सामाजिक पातळीवरील जबाबदारी आहे.
नक्षलवादी केवळ समस्या व प्रश्न मांडतात. पर्यायी विकासाची कल्पना देत नाहीत. हिंसाचार संपल्यास आपली ओळख संपेल, याची जाणीव नक्षलवाद्यांना आहे. त्यामुळे हिंसाचार करून दहशत निर्माण करणे व समाजातील असंतोष हेरण्याचे काम नक्षलवादी करीत असतात. नक्षलवाद्यांना मारून टाकल्याने किंवा अटक करण्याने नक्षल चळवळ संपणार नाही. नक्षलवादाचा विरोध ही विचारांची लढाई आहे, असे देवेंद्र गावंडे म्हणाले.
आदिवासींविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही. त्यांच्या प्रश्नांचे त्यांना काही देणेघेणे नाही. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात निष्पाप नागरिकांचे बळी जातात, दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलत नाहीत, अशी खंत गावंडे यांनी व्यक्त केली. या सरकारच्या काळात हिंसाचार कमी आहे, याचा अर्थ सरकारची कामगिरी दमदार आहे, असा होत नाही, तर नक्षलवाद्यांकडील मनुष्यबळ कमी असल्याने हिंसाचार कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘सामर्थ्य’चे वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव यांनी प्रास्ताविक, प्रा. अशोक सोनोने यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालक सीमा शेटे रोठे यांनी केले.
चौकट
विदर्भ मृत्यूचा प्रदेश
नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात निष्पाप नागरिकांचे बळी, वाघांच्या हल्ल्यात होणारी मृत्यू व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कारणांमुळे विदर्भ हा मृत्यूचा प्रदेश झाला आहे. हे चित्र बदलण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे देवेंद्र गावंडे म्हणाले.
भाजपपेक्षा काँग्रेसच्या काळात सर्वाधिक कारवाया
२०१४ नंतर भाजपच्या काळात नक्षलवाद विरोधाच्या सर्वाधिक कारवाया झाल्याचा अपप्रचार सातत्याने करण्यात येतो. मात्र, भाजपपेक्षा काँग्रेस सत्तेमध्ये नक्षलवाद्यांवर सर्वाधिक कारवाई झाली आहे, अशी माहिती देवेंद्र गावंडे यांनी दिली.
श्रमिक पत्रकार संघाकडून सत्कार: अकोला श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने नक्षलवादाचे अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर, श्रमिकचे अध्यक्ष अजय डांगे, सचिव आशिष गावंडे, महेश घोराळे, विशाल बोरे आदी उपस्थित होते.