मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळा क्र. ७ येथे पुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी ‘पुस्तक वाचन’ स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केले.
पुस्तके माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत – प्रा.संजय खडसे
स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनचा विशेष उपक्रम
अकोला : वाचनातून ज्वलंत कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह विकसित होतो. पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे. प्रेरणादायी पुस्तके आपले जीवन बदलू शकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनात सातत्य ठेवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी येथे केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळा क्र. ७ येथे पुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती सदस्य भीमराव डोंगरे होते. यावेळी डॉ. श्रीकांत उखळकर, राजकुमार उखळकर, अनुश्री उखळकर, सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, श्रीराम देशपांडे, विजय शिंदे, अरुण देशमुख, मुख्याध्यापक हरिशचंद्र इटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाळेला उपयुक्त पुस्तकांचा संच भेट देऊन विद्यार्थ्यांना देखील पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलतांना प्रा. संजय खडसे म्हणाले, वाचनाची सवय लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुमचे मन सक्रिय, मजबूत आणि निरोगी ठेवते. तुमच्या एकूण वैयक्तिक वाढीसाठी आणि विकासासाठी वाचन महत्त्वाचे आहे. चरित्रे वाचणे आपल्याला कठोर परिश्रम करण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित राहण्यास देखील प्रोत्साहित करू शकते. डॉ. श्रीकांत उखळकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगून स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने गरजू शाळा व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. वाचनाची सवय लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुमचे मन सक्रिय, मजबूत आणि निरोगी ठेवते. तुमच्या एकूण वैयक्तिक वाढीसाठी आणि विकासासाठी वाचन महत्त्वाचे आहे, असे प्रबोध देशपांडे म्हणाले. महापालिकेच्या शाळा क्र. ७ मधून गुणवत्त विद्यार्थी घडत आहे, असे भीमराव डोंगरे यांनी सांगितले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक हरिशचंद्र इटकर यांनी गत पाच वर्षात शाळेमध्ये वाढलेली पटसंख्या आणि शाळेच्या शैक्षणिक दर्जाची माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिता नवलकार यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवत्तेला प्रोत्साहन मिळणार
महापालिकेच्या शाळा क्र. ७ मधून यंदा शिष्यवृत्तीच्या परीक्षेत सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रबोध देशपांडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक जाहीर केले.