पैशांच्या ‘चमक’मुळे समाजातील मन:शांती हरवली – सत्यपाल महाराज
अकोला : भौतिक सुख-सुविधेच्या मागे समाज धावत सुटला आहे. ते मृगजळ असल्याची कल्पना असूनही त्याचा स्वीकार करायचा नाही. पैशांच्या ‘चमक’पुढे आकर्षित होऊन देहभान, सामाजिक कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरले आहेत. त्यामुळेच जीवनात तणाव वाढून समाजातील सुख, शांती, समाधान हरवले, असे मत राष्ट्रीय समाजप्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी आज येथे व्यक्त केले.
सामर्थ्य फाउंडेशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रविवारी श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात आयोजन सोहळ्यात ते बोलत होते. दि बेरार जनरल एज्युकेशन सोयायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसिद्ध चित्रकार सतिश पिंपळे यांनी रेखाटलेले तैलचित्र देऊन सत्यपाल महाराजांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार ‘सामर्थ्य’चे कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडखले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगावकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, डॉ. श्रीकांत उखळकर, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, प्रकाश जाधव, मुकुंद देशमुख आदींनी केला. तैलचित्राचा अर्थबोध मिलिंद देव यांनी सांगितला. यावेळी संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते केले.
संकेतस्थळाची माहिती प्रा.दत्तराज विद्यासागर यांनी दिली. सत्यपाल महाराजांची सामाजिक सद्यस्थिती, कुटुंब व्यवस्था, तणावावरओघवत्या शैलीत भाष्य केले. आज मनुष्य भौतिक सुविधांच्या मागे लागला. जीवनात ती मिळवण्याची लालसा असते. मात्र, त्यातून शांती-समाधान प्राप्त होत नाही. अनेकांना सुखाची झोप सुद्धा लागत नाही. समाजासाठी सुद्धा आपण काही देणे लागतो, याचे भान ठेऊन सामाजिक कार्यातून जीवनात समाधान शोधा, असे आवाहन सत्यपाल महाराजांनी केले.
आधुनिक जीवनात तणाव वाढला. त्या तणावातूनच आत्महत्येसारखे टोकाचे विचार मनात येतात. आजची तरुण पिढी मोबाइल सारख्या साधनांच्या आहारी जावून भान विसरली. कुटुंबामध्ये आपसातील संवाद हरवला आहे. विभक्त व चौकोनी कुटुंबामुळे मन मोकळे करायला देखील कुणी सापडत नाही. त्यांची सुरक्षा धोक्यात येते. एकत्र कुटुंब व्यवस्था सर्वश्रेष्ट असल्याचे ते म्हणाले.
सामर्थ्य फाउंडेशनने सामाजिक कार्यासह वैचारिक चळवळ निर्माण केल्याचे ज्येष्ठ पक्षमित्र दीपक जोशी यांनी सांगितले. युवा वर्गामध्ये तणाव वाढल्याने ते वाईट मार्गावर जाण्याचा धोका असतो.
त्यामुळे संवाद आवश्यक असल्याचे डॉ. विजय नानोटी म्हणाले. सामर्थ्यच्या व्यापक उपक्रमांची माहिती प्रबोध देशपांडे यांनी प्रास्ताविकात दिली. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.डॉ.अशोक सोनोने यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संतोष भोरे यांनी, तर अभार अशोक पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सत्यपाल महाराजांची राजकीय फटकेबाजी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल महाराजांनी आपल्या व्याख्यानात राजकीय फटकेबाजी देखील केली. नाव घेऊन टीका केल्याने काय होते, हे नुकतेच एका नेत्याने खासदारकी गमवून अनुभव घेतला होता. त्यामुळेच मी कुणाचे नाव घेऊन बोलत नाही, असा टोला सत्यपाल महाराजांनी लगावला. आता अनेक जण उभे राहण्यासाठी सरसावतील. समाजात तणावाचे वातावरण वाढेल, असे देखील ते म्हणाले. सत्यपाल महाराजांनी अंद्धश्रद्धा व भ्रष्टाचारावर देखील प्रहार केले.