सामर्थ्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी

अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने ३ ते ५ डिसेंबरदरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर व समाजसेवी डॉ. स्मिता कोल्हे पुष्प गुंफणार आहेत. या माध्यमातून वैचारिक मेजवानी उपलब्ध होईल.

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दि बेरार जनरल एज्युकेशन साेसायटीच्या सहकार्याने सामर्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन केले. शहरातील श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात ३ ते ५ डिसेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प स्व.पांडुरंग राठोड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘मेळघाटातील महिलांचे स्थान आणि सामाजिक कार्यातील भूमिका’ या विषयावर गुंफले जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी डॉ. स्मिता कोल्हे प्रमुख वक्त्या म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेरार संस्थेचे मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी उपस्थित राहतील. ज्येष्ठ समाजसेवी डॉ. रवींद्र कोल्हे, स्त्री मूळव्याध तज्ज्ञ डॉ. सुनीती राठाेड, डॉ. सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहील. स्व. गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुष्प पुणे येथील विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, तर वंचित आघाडीचे विभागीय अध्यक्ष बालमुकुंद भिरड यांची प्रमुख उपस्थिती राहील.

५ डिसेंबरला स्व. रवींद्र इधोळ यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे येणार आहेत. ‘भारतीय लोकशाही व्यवस्थेत महिलांची भूमिका आणि आरक्षण’ या विषयावर त्या व्याख्यान देतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता उपस्थित राहतील. डॉ. श्रुती इधोळ, डॉ. सागर इधोळ यांची प्रमुख उपस्थिती राहील. व्याख्यानमालेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, मार्गदर्शक पवनकुमार कछोट, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, नितीन डोंगरे, प्रा.अशोक सोनोने, ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, डॉ. श्रीकांत उखळकर, डॉ. सागर इधोळ, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भाेरे, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, नकुल राठी, प्रकाश जाधव, सुधीर धुळधुळे, मुकुंद देशमुख, मिलिंद शनवारे, मिलिंद देव, अशोक पेटकर, फुलसिंग राठोड, प्रा. दत्तराज विद्यासागर, मुकेश मिना आदींनी केले.

‘मातृशक्ती’ विशेष व्याख्यानमाला

लोकसभा आणि विधानसभेसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक सप्टेंबर महिन्यात संसद भवनात मंजूर झाले. त्या पार्श्वभूमीवर यंदाची सामर्थ्य व्याख्यानमाला ‘मातृशक्ती’ विशेष ठेवण्यात आली आहे. सर्व विषय महिलांशी संबंधित असून स्त्री वक्त्याच व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमात गरजू, निराधार निवडक महिलांना साडीचे वाटप देखील केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *