सामर्थ्य व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प
अकोला : समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.
सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेचे स्व. गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुष्प ‘स्त्रियांची सामाजिक वाटचाल’ या विषयावर गुंफतांना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, तर व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, विजया भिरड, सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे सत्कार संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा, डॉ. अशोक सोनोने, विजय शिंदे, ॲड. संतोष भाेरे, प्रशांत चाळीसगावकर, किरण चौक, मिलिंद देव, अनिता पळसपगार, अनुश्री उखळकर, सविता राठोड आदींनी केले.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांच्या अधिकाराच्या वाटवाचाल प्रा.अंजली आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण उलगडली. ‘चूल आणि मूल’ पुरते मर्यादित असलेल्या देशातील महिला स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने प्रथम घराबाहेर पडल्या. नोकरी, राजकारणात आल्या. हा क्रांतिकारी आमूलाग्र बदल भारताच्या संविधानाने महिलांना दिला. त्याचे श्रेय घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समितीला आहे. जाती व्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला.
आजच्या काळात महिलांना संपत्तीत मिळालेला समानता, मनाने नको ते लग्न मोडण्याचा आणि एका विशिष्ट प्रौढ वयात लग्न करण्याचा अधिकार त्याकाळी संविधान निर्मितीनंतर घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीपुढे हिंदू कोड बिलामध्ये मांडलेला होता. त्यामुळेच ते फेटाळले गेले होते, हे सर्व स्त्रियांनी समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रा.आंबेडकर म्हणाल्या.
१९७५ नंतर देशात खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चळवळीला गती मिळाली. हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झाले होते. त्याचवर्षी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती. महिलांच्या कार्यक्रमावर महिला पंतप्रधानाने बंदी लावली तर चहूबाजूने टिकेची झोड उठणार, हे लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमावरीस बंदी उठवली. विरोधी पक्षांनीही महिलांच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन त्याचा फायदा घेतला. त्यामुळे स्त्री मुक्ती चळवळीला नवी दिशा मिळाली, असे देखील त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. स्वाती दामोदरे यांनी केले. आभार ॲड. धनश्री दामोदरे यांनी मानले.
महिलांच्या राजकीय आरक्षणाला आणखी प्रतीक्षाच
घटना दुरुस्ती करुन महिला विधेयक आणले असले तरी महिलांना प्रत्यक्ष राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आणखी १० वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, असे प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या.