सामर्थ्य फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम; गरजूंच्या जीवनात आनंद पेरणार
अकोला : वंचित, गरजूंच्या जीवनात दिवाळसणाचा आनंद पेरुन सामाजिक उपक्रमांची दिवाळी पहाट हा नाविन्यपूर्ण उपक्रम सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने राबविला जाणार आहे. हलाखीच्या परिस्थित जीवन जगणाऱ्यांना दिवाळीचा गोडवा देण्याचा प्रयत्न उपक्रमातून केला जाईल.
दीपोत्सवानिमित्त प्रत्येक घरात चैतन्याचे वातावरण असते. नवीन कपडे, फटाक्यांचे आतषबाजी व खमंग फराळाच्या मेजवानीचा आनंद घेतला जातो. समाजातील गरजू, निराधार या आनंदापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येते.
रस्त्याच्या कडेला राहणारे, शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीतील रहिवासी व मेळघाटातील दुर्गम भागातील निराधारांसह अनेक गरजूंच्या जीवनात दिवाळीचा आनंद पेरण्यासाठी सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सामाजिक उपक्रमांची दिवाळी हा विशेष उपक्रम हाती घेतला. यामध्ये लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबिजेच्या दिवशी पहाटे निराधारांना कपड्यांसह चविष्ट फराळाचे वाटप केले जाणार आहे. मिष्टान्नाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली जाईल. महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
अनेकांकडे चांगले दर्जेदार वस्त्र वापराअभावी पडून असतात. कपडे लहान होत असल्याने त्याचा वापर होत नाही. सामाजिक दिवाळी उपक्रमात नवीनसह समाजाकडून प्राप्त चांगल्या कपड्यांचे सुद्धा वितरण होईल. घरी निरुपयोगी असलेल्या वापरण्यायोग्य इतर वस्तू देखील गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातील. या उपक्रमासाठी रोख मदतही देता येईल. समाजातील दानशूर व्यक्तींनी कपडे, साहित्य व मदत जमा करण्यासाठी सुर्यकांत बुडकले (९९७५१७१२७७) अकोला कराओके क्लब गुप्ते रोड जठारपेठ, अकोला, प्रशांत चाळीसगांवकर (९५०३४१७००२)मुकुंद मंदिराजवळ रामदास पेठ व विजय मोहरीर (९८५०३६२३३४)आकृती स्टुडिओ, उमरी रोड टॉवर चौक येथे संपर्क करता येईल.
या उपक्रमात अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सल्लागार डॉ. दीपक दामोदरे, नितीन डोंगरे, प्रा.अशोक सोनोने, ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भाेरे, निमंत्रित तज्ज्ञ डॉ.श्रीकांत उखळकर, कार्यकारिणी सदस्य राजकुमार उखळकर, दिनेश चंदन, किरण चौक, श्रीराम देशपांडे, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, नकुल राठी, प्रकाश जाधव, सुधीर धुळधुळे, मुकुंद देशमुख, मिलिंद शनवारे, मिलिंद देव, अशोक पेटकर, फुलसिंग राठोड, प्रा. दत्तराज विद्यासागर, मुकेश मिना आदींनी केले.
‘फराळ’ स्वरूपात मदतीचा हात
दिवाळीनिमित्त विशेष उपक्रम राबवून निराधारांपर्यंत कपडे, दिवाळी फराळ पोहोचवला जाणार आहे. या उपक्रमात दिवाळीच्या ‘फराळ’ स्वरूपात सुद्धा मदत केली जाऊ शकते. तो योग्य गरजूंपर्यंत पोहोचवला जाईल, अशी माहिती ‘सामर्थ्य’च्यावतीने देण्यात आली.