पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२३

पर्यावरणपूरक उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक – डॉ. गजानन नारे

‘सामर्थ्य’च्या गणेशोत्सव स्पर्धेत मेघा राजूरकर प्रथम, नमन पनपालिया द्वितीय, तर डॉ. स्मिता कोरडेंना तृतीय पुरस्कार

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सामर्थ्य फाउंडेशनने सर्व वयोगटासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. संस्थेचा घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी येथे केले.

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अकोला एज्युकेशन सोसायटीच्या टिळक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डॉ. एस.आर.अमरावतीकर, तर व्यासपीठावर संजय देशमुख, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव आदी उपस्थित होते.

न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव मुंशी, ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभजितसिंह बछेर, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे महासचिव सिध्दार्थ शर्मा, मराठी थिऑसाॅफिकल फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. संजय पोटे, समाजसेवक नीलेश देव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहसचिव सुर्यकांत बुडकले, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगांवकर, डॉ. दीपक दामोदरे आदींनी केले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, पत्रकार राजकुमार उखळकर, किरण चौक, श्रीराम देशपांडे, दिनेश चंदन, विलास राठोड, मिलिंद देव, विजय मोहरीर, मुकुंद देशमुख, अशोक पेटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण केले. परीक्षक डॉ. अशोक सोनोने, डॉ. श्रीकांत उखळकर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. चिन्मय देव यांनी प्रयोजित केलेल्या प्रथम पुरस्काराचे मानकरी मेघा राजूरकर, द्वितीय पुरस्कार नमन पनपालिया, तृतीय पुरस्कार डॉ.स्मिता कोरडे, तर संजय देशमुख यांनी प्रायोजित केलेले प्रोत्साहनपर पारितोषिक वैष्णवी ढवळे (राठोड), वैष्णवी मोहरीर, सचिन बेलोकार, चैताली बुंदेले यांना जाहीर केले. मान्यवरांच्या हस्ते चांदीची गणेशमूर्तीची फ्रेम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

निरंतर सुरू असलेले सामर्थ्यचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत प्रा.एस.आर. अमरावतीकर यांनी व्यक्त केले. पर्यावरणस्नेही सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेतून प्रोत्साहित करण्यात आल्याचे प्रबोध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पेटकर व डॉ. श्रीकांत उखळकर यांनी, तर आभार डॉ. गजानन वाघोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *