मेळघाटात महिलांच्या जीवनात सहजता, तर शहरी भागात निराशावाद – डॉ. स्मिता कोल्हे

मेळघातील महिलांच्या जीवनात सहजता, आनंद व समाधान आहे, त्या उलट शहरी भागातील महिलांमध्ये निराशावाद, असमाधानपणा आढळून येतो. मेळघाट व शहरी भागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाटातील महिलांमध्ये स्वावलंबन आहे. विदेशात जाऊन आपण स्वावलंबन स्वीकारतो, तेच आपल्या देशातील शहरांमध्ये का स्वीकारले जात नाही? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी करीत साध्या गोष्टीतून आनंद उपभोगता आला पाहिजे, असा सल्ला दिला.

अकोला: मेळघातील महिलांच्या जीवनात सहजता, आनंद व समाधान आहे, त्या उलट शहरी भागातील महिलांमध्ये निराशावाद, असमाधानपणा आढळून येतो. मेळघाट व शहरी भागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाटातील महिलांमध्ये स्वावलंबन आहे. विदेशात जाऊन आपण स्वावलंबन स्वीकारतो, तेच आपल्या देशातील शहरांमध्ये का स्वीकारले जात नाही? असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी करीत साध्या गोष्टीतून आनंद उपभोगता आला पाहिजे, असा सल्ला दिला.

दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीच्या विशेष सहकार्यातून सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘मेळघाटातील महिलांचे स्थान आणि सामाजिक कार्यातील भूमिका’ या विषयावर गुंफतांना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बेरार संस्थेचे मानद सचिव डॉ. पवनकुमार माहेश्वरी, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे उपस्थित होते. डॉ. सुभाष राठोड, डॉ. सुनीती राठोड, सामर्थ्यचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिथींचे स्वागत मंगला वाघोडे, माधवी उखळकर, मंजुषा बुडकले, डॉ. श्रीकांत उखळकर, प्रवीण पळसपगार, अशोक पेटकर, रवींद्र बुलनकर, दिनेश चंदन, राजकुमार उखळकर, श्रीराम देशपांडे, किरण चौक, विलास राठोड आदींनी केले.

डॉ. स्मिता कोल्हे यांनी संघर्षपूर्ण जीवनपट उलगडला. नागपूरमध्ये सुखवस्तू जीवन जगत होते. अशात ४०० रुपयात महिन्याचा संसार, पाच रुपयात लग्न, ४० किलोमीटर दररोज चालणे आणि दुसऱ्यांसाठी भीक मागण्याची तयारी अशा अटींना सहमती देत डॉ. कोल्हे यांच्याशी लग्न झाले. शेणाच सारवण, जात्यावर दळण, चुलीवर स्वयंपाक व कंदिलात प्रकाशात संसार सुरू असतांना जीवनाचा प्रामाणिकपणा मनाला भावला, असे त्या म्हणाल्या.

मेळघाटाच्या जीवनात साधेपणा, सहजता आणि स्वातंत्र्य आहे. महिला निर्भय आहेत. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने लग्नासोबत घटस्फोटाचाही अधिकार आहे. लग्न आवश्यक नाही. दोन मुल झाल्यानंतरही लग्न केले जातात. स्त्रीभ्रुणहत्या नाही. कुमारी मातांचा सहज स्वीकार होतो. अनाथ नाहीत. वृद्धांची गरज आहे. त्यामुळे वृद्धाश्रम नाहीत. केवळ गरीबी व कुपोषणाची समस्या आहे. ती दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मेळघाटातील प्रश्नांवर लढा देतांना डॉ.स्मिता कोल्हे यांची बरोबरीने साथ लाभल्याचे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. स्वाती दामोदरे यांनी केले. आभार ॲड. धनश्री दामोदरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *