सामर्थ्य फाउंडेशन रजिस्ट्रेशन नं. MAH/239/2022
‘सामर्थ्य’ विषयी थोडसं…
अकोला शहरातील होमगार्ड मैदानावर क्रिकेट खेळणारा ‘मॉर्निंग बॉईज क्रिकेट क्लब’ आहे. या क्रिकेट क्लबचे वैशिष्ट्ये म्हणजे एकाच टीममध्ये २५ ते ६५ वर्ष वयोगटातील खेळाडू. वयाची पन्नाशी ओलांडलेले मात्र मनाने ‘तरुण’ खेळाडू एखाद्या नवयुवकालाही लाजवेल, असे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळ सादर करतात. समुहामध्ये विचारांचे आदान-प्रदान होण्यासह शरीर तंदुरुस्त व मन प्रसन्न राहण्यासाठी हा क्लब २०११ पासून निरंतरपणे कार्यरत आहे. या क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य देखील करण्यात आले. हे कार्य एका संस्थेच्या माध्यमातून व्हावं म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत सदस्यांनी एकत्र येत ‘सामर्थ्य फाउंडेशन, अकोला’ या सामाजिक संस्थेचे मुहूर्तमेढ ऑगस्ट २०२२ मध्ये रोवली. ‘सामर्थ्य’ ही आता अकोला (महाराष्ट्र, भारत) शहरातील एक प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था म्हणून समोर आली आहे. ‘कृतीतून परिवर्तनाकडे…’ या ब्रिद वाक्यावर दृढ विश्वास ठेवून सदस्यांच्या माध्यमातून सामाजिक काम करणे हे ‘सामर्थ्य’चे वेगळेपण आहे. संस्थेचे सदस्य केवळ आर्थिक मदत देण्यावर थांबत नाहीत, तर यथाशक्ती आपला वेळ, कौशल्य पण सामाजिक कार्यासाठी देतात. ‘सामर्थ्य फाउंडेशन’ ही संस्था सामाजिकसह सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, कृषी आदींसह वैविध्यपूर्ण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे.
ज्येष्ठ समाजसेवी, अनाथांचे नाथ डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या हस्ते ‘सामर्थ्य फाउंडेशन’चे उद्घाटन १४ ऑगस्ट २०२२ रोजी झाले. ‘सामाजिक कार्याचे बदललेले स्वरूप व स्वयंसेवी संघटनांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी मार्गदर्शन केले. ‘सामर्थ्य’च्यावतीने २०२२ वर्षांमध्ये १५०० वृक्षरोपण करण्यात आले. केवळ वृक्षारोपणावरच मर्यादित न राहता ते मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्याचा विढाच संस्थेच्या सदस्यांनी उचलला. उन्हाळ्यामध्ये अकोला शहरातील ४५ डिग्री अं.से. तापमानामध्ये वृक्षांना जगविण्यासाठी ‘सामर्थ्य’च्या सदस्यांची धडपड असते. आपल्या घरून पाण्याची बॉटल आणत त्या वृक्षांना पाणी टाकल्या जाते. वृक्षांच्या संगोपनासाठी ‘सामर्थ्य’वान सदस्यांची सर्वोतोपरी प्रयत्न असतात.
संस्थेच्यावतीने पूर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. घरगुती गणेशोत्सवात पर्यावरण व जनजागृतीपर आकर्षक देखावा-सजावट स्पर्धा ‘सामर्थ्य’च्यावतीने दरवर्षी घेण्यात येते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सोबत घेऊन संस्था वृक्षारोपण व संवर्धनाची विशेष मोहीम देखील राबवते. संस्थेने शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सर्व वयोगटासाठी इंग्रजी संभाषण व भाषा विकसित अभ्यासक्रम (इंग्लिश स्पिकिंग) राबविण्यात येत आहे. शहरात कचरा वेचणाऱ्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षण रुजविण्याचे कार्य संस्कार वर्गातून होत असते. या उपक्रमाला सामर्थ्य फाउंडेशनने मोलाचा मदतीचा हात दिला. संस्कार वर्गाला ‘सामर्थ्य’चे कार्यकारिणी सदस्य श्री.दिनेश चंदन यांच्या सौजन्याने एक मोठा पांढरा फळा भेट देऊन वर्गातील लहान बालकांना खाउंचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम ‘सामर्थ्य’ने राबवला.
सामर्थ्य फाउंडेशनने दि बेरार जनरल एज्युकेशन साेसायटीच्या सहकार्यातून ११ ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान तीन दिवसीय सामर्थ्य व्याखानमाला घेतली. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प ‘परिस्थिती आज आणि उद्या’ या विषयावर आंतरराष्ट्रीय विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुंफले. द्वितीय पुष्प ‘शहरी नक्षलवाद – प्रचार आणि वास्तव’ या विषयावर नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नक्षलवादाचे अभ्यासक देवेंद्र गावंडे यांनी, तर तृतीय पुष्प ‘ऊर्जा क्षेत्रापुढील आव्हाने, वीज ग्राहकांवरील परिणाम व त्यांची भूमिका’ या विषयावर महावितरणचे संचालक (वाणिज्य) तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांनी गुंफले. या माध्यमातून अकोलेकरांना वैचारिक मेजवानी लाभली. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त स्व.शांताराम जैन स्मृती प्रतिष्ठान व सामर्थ्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळा क्र. ७ येथे पुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी ‘पुस्तक वाचन’ स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केले. मेळघाटातील वंचित, गरजू आदिवासी नागरिकांना मदत मिळण्याच्या दृष्टीने ‘सामर्थ्य’ने विशेष उपक्रम हाती घेतला. समाजातून चांगले, वापरण्यास योग्य कपडे गोळा करून ते मेळघाटमधील दुर्गम गाव धारुर धारगड येथे वाटप करण्यात आले. परिधान करण्यासाठी उत्कृष्ट वस्त्र मिळाल्याने गरजू आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. गावात चिमुकल्यांना विविध खाऊंची मेजवानी देखील देण्यात आली.
संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ३ सप्टेंबरला श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय समाजप्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक श्री. सत्यपाल महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक परिवर्तन घडण्यासाठी ‘सामर्थ्य’च्या माध्यमातून विविध क्षेत्रात व्यापक, महत्त्वाकांक्षी, समाजाभिमूख उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
आमचा पत्ता
सामर्थ्य फाउंडेशन अकोला,
द्वारा श्री. प्रकाश विष्णुपंत देशपांडे यांचे घर,
मु.पो. प्रबोध निवास संत ग,जानन महाराज मंदिराजवळ,
तापडिया नगर, अकोला